प्रस्तावना:
आंबा हे भारत देशाचे राष्ट्रीय फळ आहे. तसेच आंबा या फळाला फळांचा राजा असे म्हटले जाते. आंबा हे फळ विषुववृत्तीय प्रदेशात आढळून येते. आंबा हे फळ आपल्या अवीट गोडीमुळे सर्वात प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे आंबा या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा असे म्हटले जाते.
आंबा या फळाचा उगम
आंबा या फळाचा उगम नक्की कुठे जहाल हे माहित नाही. परंतु दक्षिण आणि पूर्व दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता पाहताच असे मानण्यात आले की, आंब्याचा उगम याच भागात झाला असावा.एप्रिल ते जून महिना या फळाचा हंगाम आहे.
आंब्याचा मोहर
आंब्याच्या झाडाला जी फुले येतात त्यांना मोहर असे म्हटले जाते. त्या मोहराला एक प्रकारचा मंद सुवास येतो. आंबा या फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कोय असते.
आंब्याची आढी
आंबा हे फळ पिकविण्यासाठी आंब्याचा माच लावला जातो किंवा त्याला आंब्याची आढी लावणे असे म्हटले जाते.
यासाठी एका खोलीत वाळलेले तणस किंवा भाताचे वाळलेले गवत पसरून त्याच्यावर कच्चे आंबे ठेवले जातात. १० ते १५ दिवस आंबे झाकले गेल्यामुळे उष्णतेने पिकतात.
आंब्याचे झाड
आंब्याचे झाड हे साधारणपणे ३० ते ४० मीटर एवढे उंच असते. आंब्याची पाने ही सदाबहार असतात. जेव्हा आंब्याची पाने कोवळी असतात तेव्हा त्या पानांचा रंग केशरी – गुलाबी असतो. जसजशी ही पाने मोठी होत जातात तसतसा पानांचा रंग हा गडद हिरवा होत जातो.
आंब्याचा रंग
आपल्या भारत देशामध्ये आंबा हे फळ विविध रंगांमध्ये आणि आकारामध्ये आढळून येते. जसे कि हिरव्या, पिवळ्या आणि नारंगी रंगांमध्ये आढळतो.
जेव्हा आंबा कच्चा असतो तेव्हा तो हिरव्या रंगाचा असतो. त्यानंतर काही दिवसांनी आंबा पिकू लागतो तेव्हा तो पिवळ्या आणि नारंगी रंगांमध्ये आढळून येतो.
राष्ट्रीय फळ
आंबा हे फळ भारत आणि पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे. तसेच बांगलादेशचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाइन्सचं ‘राष्ट्रचिन्ह’ आहे.
आपल्या भारत देशात आंब्याच्या अनेक जाती आहेत. जसे की हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नाडिस, रायवळ इ. जाती आहेत.
धार्मिक कार्यामध्ये महत्त्व
आंब्याला धार्मिक कार्यातही खूप महत्त्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी, मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते.
तसेच कलशपूजन हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये नेहमी कलशात आंब्याची पाने किंवा डहाळे ठेवले जातात.
आंब्याचे उत्पादन
भारत देश आंबा हे फळ उत्पादन करण्यात अग्रेसर आहे. भारतात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन केले जाते.
तसेच भारतातील उत्पादित केलेले आंबे हे बाजारपेठेत आणि अन्य देशात सुद्धा पाठवले जातात. आजही आपल्या देशातील बरेच शेतकरी हे आंब्यांना आपल्या रोजगाराचे मुख्य पात्र मानतात.
आंब्याचं उपयोग
आंब्याचं उपयोग हा घरातील खाद्य पदार्थात केला जातो.
कच्च्या आंब्यांपासून लोणचे तयार केले जाते. हे लोणचे चवीला खूप स्वादिष्ट असते.
तसेच पिकलेल्या आंब्याचा आमरस करतात आणि त्याच्या फोडी करून खातात.
कारवारी लोक हे पिकलेल्या आंब्याची भाजी करून खातात. तिला साटे असे म्हटले जाते.
कच्च्या आंब्यांच्या फोडी उन्हात वाळवून त्याचा उपयोग आमटीमध्ये केला जातो.
हिरव्या कैऱ्या किसून त्याचा आमचूर तयार केला जातो.
कैरीची आंबट किंवा तिखट चटणी केली जाते. राजापुरी आंब्यांपासून मुरंबा किंवा साखरांबा बनवला जातो.
निष्कर्ष:
आंब्याचे झाड हे खूप मोठे असते. आंबा आपल्या चवीमुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आंब्याचे झाड हे औषधी गुणधर्मांची सुद्धा उपयुक्त आहे. पिकलेला आंबा लहान मुले आणि मोठी माणसे देखील आवडीने खातात.