प्रस्तावना:
आमचा भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशामध्ये भिन्न – भिन्न प्रकारचे उत्सव साजरे केले जातात.
त्या सर्व उत्सवांपैकी गुरु पौर्णिमा हा एक महत्वाचा उत्सव आहे. गुरु पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
गुरु शब्द
गुरु हा शब्द संस्कृत भाषेत ‘अंधकार दूर करणारा’ या अर्थाने समजला जातो. गुरु हा आपल्या शिष्याचे अज्ञान दूर करून त्याच्या जीवनावर प्रकाश टाकतो.
या गुरु पौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. तसेच योग्य साधना आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी गुरु पौर्णिमेचा दिवस शुभ मानला जातो.
गुरु पौर्णिमा
आषाढ शुद्ध पौर्णिमा याच तिथीला गुरु पौर्णिमा असे म्हटले जाते. तसेच या गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटले जाते. व्यास मुनींनी महाभारत आणि पुराणे लिहिली त्यांना वंदन करण्याचा आणि पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.
अशा या महर्षी व्यास मुनीना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात सांगितले आहे. महर्षी व्यास मुनी हे ‘भारतीय संस्कृतीचे शिल्पकार’ आणि ‘मूलाधार’ मानले जातात.
महर्षी व्यास मुनींनी ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र आणि व्यवहारशास्त्र आहे असा ग्रंथ त्यांनी लिहिला.
श्लोक
“गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll”
हा श्लोक आम्ही नेहमी स्मरणात आणतो. यामध्ये भरपूर खोल अर्थ दडलेला आहे. गुरु हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आहेत. हे सर्व साक्षात परब्रह्मच आहेत.
अशा या गुरूंना मी नमन करतो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. भक्तांना ज्ञानाची प्राप्ती होते ही केवळ गुरुमुळेच. माणूस किती जरी मोठा असला तरी तरी त्याला ज्ञान हे गुरूकडूनच प्राप्त होते.
गुरु ज्ञानाचा सागर
गुरु म्हणजेच एक ज्ञानाचा सागर आहे. जसे कि जलाशयात खूप पाणी आहे. परंतु जेव्हा आपण त्याच्या समोर मान खाली घालून वाकत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी मिळत नाही. त्याच प्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही.
गुरु पौर्णिमेचे महत्व
गुरु पौर्णिमेचे विशेष महत्व आहे. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमेच्या दिवशी “ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे” अशी प्रार्थना करून त्यांना वंदन करतो.
आपल्या भारत देशामध्ये रामायण आणि महाभारत पासून गुरू – शिष्याची परंपरा हि प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो आणि विद्येच्या बळावर सर्वांचा उद्धार करत असतो.
अशा गुरूंना मान देणे आणि त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. अशी प्रथा हि महर्षी व्यास मुनी यांच्यापासून सुरु झाली.
गुरु पौर्णिमा (सद्गुरूंची पौर्णिमा)
गुरु पौर्णिमा हि ‘सद्गुरूंची पौर्णिमा’ मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहचवा यासाठी गुरुची प्रार्थना करावयाचा हा दिवस होय.
गुरु – शिष्यांच्या प्रसिद्ध जोड्या
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेने आपल्याला कृतज्ञता वाटते. आमच्या भारतीय गुरु परंपरेत गुरू – शिष्यांच्या काही प्रसिद्ध जोड्या आहेत.
जसे कि शुक्राचार्य – जनक, सुदामा – कृष्ण – सांदिपनी, विश्वामित्र – राम – लक्ष्मण, परशुराम – कर्ण, द्रोणाचार्य – अर्जुन अशी गुरु शिष्याची परंपरा आहे.
निष्कर्ष:
गुरु पौर्णिमा हा एक महत्वाचा उत्सव आहे. तसेच शीख धर्मामध्ये गुरु पौर्णिमेला विशेष महत्व आहे. गुरु हा आपल्या शिष्याला नेहमी अज्ञान रुपी अंधकारापासून ज्ञान रुपी म्हणजेच प्रकाशाच्या मार्गाकडे घेऊन जातात.
म्हणून गुरु पौर्णिमा हा सण गुरूला समर्पित करण्यासाठी साजरा केला जातो. तसेच आपण सर्वानी गुरूचा आदर आणि सम्मान केला पाहिजे.