शिक्षक दिवस मराठी निबंध – वाचा येथे Essay on Teachers Day in Marathi

प्रस्तावना:

आपल्या भारत देशामध्ये गुरु – शिष्याची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. तसेच गुरु – शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीचा एक महत्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. आपल्या जीवनामध्ये आई – वडिलांचे स्थान हे सर्वात महत्वाचे असते.

कारण आई वडील हे आपल्या जीवनातील सर्वात प्रथम गुरु असतात. परंतु जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षकच योग्य मार्ग दाखवतात. तसेच योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.

शिक्षकांचे जीवनात महत्त्व

या धरतीवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांसारखे झाले तरी शिक्षकांशिवाय कोणीही भवसागर ओलांडू शकत नाही.

ज्या काळापासून या पृथ्वीची निर्मिती झाली आहे त्यापासून या धरतीवर गुरुचे महत्त्व हे सर्वात जास्त आहे. म्हणून शिक्षक ही देवाने दिलेली एक सर्वात अमूल्य भेट आहे.

जसे की एक कुंभार मातीची भांडी तयार करायला एका हाताने हाताळतो आणि दुसऱ्या हाताने त्याला आकार देतो. त्याच प्रमाणे शिक्षक हे प्रत्येक मुलाला एक चांगली व्यक्ती घडविण्यासाठी त्याला चांगले शिक्षण देतात.

तसेच शिक्षकांच्या हातात संपूर्ण देशाचे भविष्य असते. कारण मुले ही शिक्षकांमुळेच आपल्या भविष्यात डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक इ अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून आपल्या देशाचे नाव उंचावतात.

शिक्षक दिवस केव्हा आणि का साजरा करतात –

आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी शिक्षक दिवस हा ५ सप्टेंबरला साजरा केला जातो. आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.

कारण ते एक शिक्षक होते आणि शिक्षणावर त्यांचे अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यामध्ये सर्व गुण होते. या दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांच्या प्रति सन्मान प्रकट करण्यासाठी शिक्षक दिवस साजरा करतात.

शिक्षक दिवस कसा साजरा केला जातो –

शिक्षक दिवस हा शाळा, कॉलेज आणि महाविद्यालये यामध्ये विशेष रूपाने साजरा केला जातो. या दिवशी सर्व शिक्षकांचा सन्मान केला जातो.

त्याच बरोबर या शिक्षक दिनाच्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयात विशेष कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. जसे की शिक्षकांप्रती आभार व्यक्त करणे आणि मनोगत व्यक्त करणे इ. तसेच अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवले जातात.

विद्यार्थी हे वेगवेगळ्या प्रकारे शिक्षकांचा सन्मान करतात. काही मुले शिक्षकांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू, ग्रीटिंग देऊन आभार प्रदर्शन करतात.

गुरू आणि शिष्याचे नाते

शिक्षकाला प्रामुख्याने एका माळ्याची उपमा दिली गेली आहे. कारण शिक्षक हे एकाच बागेतील विभिन्न रूप आणि रंगाची फुले सजावणाऱ्या माळ्याप्रमाणे असतात. कारण ते विद्यार्थ्यांना काट्यावर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात.

तसेच आज प्रत्येक घरात शिक्षण पोहचवण्याचे कार्य केले आहे. शिक्षित भारत बनविणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. म्हणून शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार मानले जातात. शिक्षक देखील एक चांगले चरित्र निर्माण करू शकतात.

समाजाचा निर्माणकर्ता

प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शिक्षक जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांसारखे असतात. तसेच शिक्षकांना ‘समाजाचा निर्माणकर्ता’ म्हटले जाते. त्याच बरोबर आपल्याला योग्य संस्कार आणि शिक्षण देऊन जगासमोर उभी राहण्याची ताकद ही शिक्षकांमुळेच मिळते.

म्हणून या नात्याचा महत्त्व समजण्यासाठी आणि शिक्षकांच्या प्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कारण ते समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य करतात.

निष्कर्ष:

म्हणून आपण सर्वानी कधीही शिक्षकांनी केलेले कार्य विसरू नये. प्रत्येक व्यक्तीने शिक्षकांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. शिक्षक हे आपल्या जीवनातील एक प्रेरणास्रोत आहेत. म्हणून आपण सर्वानी अशा गुरूला सदैव नमन केले पाहिजे.

Updated: दिसम्बर 14, 2019 — 12:27 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *