प्रस्तावना:
आमचा भारत देश हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशामध्ये विविध प्रकारचे सण हे साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी दसरा हा हिंदू धर्माचा सर्वात महत्वाचा आणि प्रमुख सण आहे.
हिंदू संस्कृतीतील हा खूप महत्त्व असलेला सण आहे. दसरा या सणाला ‘विजयादशमी’ किंवा ‘आश्विन शुद्ध दशमी’ असे म्हटले जाते.दसरा हा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
दसरा सण केव्हा साजरा केला जातो –
दसरा हा सण शुद्ध दशमीला येतो. दसरा हा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो. आश्विन महिन्याचा पहिल्या दिवसापासून नवरात्र साजरी केली जाते आणि त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच दसरा किंवा विजयादशमी होय. दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे.
दसरा सण का साजरा केला जातो –
दसरा हा दहा दिवसांचा सण आहे. त्यापैकी नऊ दिवस देवी दुर्गाची पूजा केली जाते आणि दहावा दिवस हा दसऱ्याच्या रूपाने साजरा करतात.
यादिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभूत करून त्याच्यावर विजय प्राप्त केला होता आणि भगवान श्रीराम आपल्या अयोध्या नगरीत परत आले होते. तसेच देवी दुर्गाने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध याच दिवशी केला होता.
दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचं महत्त्व
महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी काही मंदिरात सायंकाळी सोने लुटतात. सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देऊन त्यांच्या पाय पडून लाख मोलाचे आशीर्वाद घ्यायचे असतात.
दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्र पूजा केली जाते. तसेच सायंकाळी आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते.
साडेतीन मुहूर्तापैकी एक
दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. म्हणून या सणाच्या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे करार आणि नव्या योजनांचा प्रारंभ इत्यादी. चांगल्या गोष्टी केल्या जातात.
तसेच घर, गाडी, बंगला इत्यादी. खरेदी केले जाते. त्याच प्रमाणे सोन्या – चांदीचे दागिने खरेदी केले जातात. या दिवशी नवे व्यवसाय सुद्धा चालू केले जातात.
दसऱ्याच्या दिवशी रामलीला आयोजन
दसरा या सणाच्या मुहूर्तावर संपूर्ण १० दिवस अनेक ठिकाणी जत्रा किंवा मेळायोजित केला जातो. या जत्रेमध्ये अनेक प्रकारची दुकाने असतात. सगळी लोक जत्रेचा आनंद घेण्यासाठी जातात.
तसेच रामलीला चे आयोजन केले जाते. रामलीला मैदानावर रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांचे पेपर मॉडेल्स तयार केले जातात. तसेच काही लोक राम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका खऱ्या अर्थाने करतात.
या रामलीलामध्ये भगवान श्रीराम यांच्या जीवनातील विविध घटना दाखवल्या जातात. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी हजारो पुरुष, महिला आणि मुले ही रामलीला मैदानावर एकत्र जमतात.
विविध “प्रांतात” दसरा हा सण
महाराष्ट्र
दसरा या सणाच्या दिवशी कातकरी आणि आदिवासी स्त्रिया नाच करतात. त्याला ‘दसरा नृत्य’ असे म्हटले जाते. तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा आणि शेतीतील अवजारांची पूजा करतात. दसरा या सणाच्या दिवशी झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे.
पंजाब
दसरा या सणाच्या दिवशी पंजाबमध्ये रावण दहन केले जाते. तसेच लोक एकमेकांना मिठाई प्रदान करतात.
दक्षिण भारत
दसरा हा सण दक्षिण भारतात सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे नऊ दिवसात तीन दिवस देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते.
जसे की पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन दिवस सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस माता दुर्गाची पूजा केली जाते. तसेच धन, धान्य, कला आणि शिक्षण, शक्ती यांची उपासना केली जाते.
निष्कर्ष:
दसरा हा एक सर्वात महत्वाचा सण आहे. म्हणून संत तुकारामांनी आपल्या उक्तीमध्ये दोन सणांचा अजोड उल्लेख केला आहे. जसा कि ‘साधू संत येता घरा, तोचि दिवाळी – दसरा’.