पर्यावरण वर मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Environment

प्रस्तावना

पृथ्वी हा एक असा ग्रह आहे, ज्यावर मानव वस्ती आहे. मानवाला आपले जीवन जगण्यासाठी या ग्रहावर विविध नैसर्गिक संसाधने समाविष्ट आहेत. या ग्रहावर जर कोणी बुद्धिमान प्राणी असेल तर तो – मानव.

मानव आणि पर्यावरण या दोघांचा भरपूर पुराना संबंध आहे. या पर्यावरणातून मानवाला अनेक गोष्टी प्राप्त होतात. त्या सर्व गोष्टींचा उपयोग मनुष्य आपल्या जीवनामध्ये करतो. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून या पर्यावरणातून आपला विकास साधून घेतला. पण तो त्याची परतफेड करायला विसरला.

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून काही घेतो तेव्हा त्याच्या प्रती नेहमी कृतज्ञ राहतो, कधीही कृतघ्न नाही होत. हा निसर्ग मानवाला भरपूर काही देतो पण त्याच्या बदल्यात तो काहीही मागत नाही. तरीपण मानव आपल्या सुखासाठी व स्वार्थ पुरा करण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास करतो.

पर्यावरण म्हणजे काय 

आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी उपलब्ध आहेत जसे कि, झाडे, पशु – पक्षी, नदी – नाले, डोंगर, पर्वत, वारा, भूमी, पाणी या सर्व गोष्टी म्हणजेच ‘पर्यावरण’ होय.

मानवाचे कर्तव्य

प्रत्येक व्यक्ती हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. याचे भान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही कुटुंबाचा एक भाग असून तिला त्या गोष्टीचे भान असते. त्यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी व स्थिरता दिसून येते.

जर कुटुंबातील एक जरी व्यक्ती वाईट वागली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे सुद्धा तसेच आहे. पर्यावरणातून मानवाला शुद्ध हवा मिळते.

तसेच फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते व सर्व सजीवांना जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळतो. म्हणून मानवाचे कर्तव्य आहे कि, आपण पर्यावरणाची रक्षा केली पाहिजे.

अन्न व पाणी

मानव आणि सर्व सजीव हे अन्नाशिवाय काही दिवस उपाशी राहू शकतात पण पाण्याशिवाय एक तास सुद्धा जिवंत राहू शकत नाही. पाणी हे मानवाला जगण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे.

ऑक्सिजनचे मोठे कार्य हे वृक्ष करत असतात. वनस्पती हे स्वतःचे अन्न स्वत: तयार करतात आणि हवेतील कार्बन डाय ऑक्साइड अवशोषित करतात.

मानवाचे जीवन हे पांच तत्वांवर अवलंबून आहे. जसे कि भूमी, जल, अग्नी, आकाश आणि वायू परंतु आज मानव पर्यावरणाला नुकसान पोहचवत आहे.

वाढती लोकसंख्या

आज मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही वाढत आहे. लोकसंख्या वाढत असल्यामूळे मानवाच्या गरजाही वाढल्या आहेत. कुटुंबातील संख्या वाढू लागली आणि त्यांना राहण्यासाठी घरांची आवश्यकता भासू लागली.

मानव घरे बांधण्यासाठी जंगलतोड तथा वृक्षांची तोड करू लागला. जंगल तोड झाल्यामुळे मानवाची वस्ती वाढू लागली आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला. त्यामुळे अन्य प्रदुषणाच्या समस्या सुद्धा उद्भवू लागल्या.

पर्यावरण संरक्षण

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि सगळ्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत देशामध्ये ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

जंगल वाचविण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी ‘चिपको आंदोलन’ सुरु केले होते. या धरतीवर वृक्षांचे सर्वात जास्त महत्त्व आहे.

म्हणून संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती.” खरोखरच हे वृक्ष आपले सगे – सोयरे, नातलग आणि मित्र कुटुंबातील आहेत.

निष्कर्ष

पर्यावरण आणि मानव हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणून पर्यावरणाला वाचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त झाडे लावून या धरतीला सुजलाम – सुफलाम बनवले पाहिजे.

जेव्हा या पृथ्वीवरील सर्व देश, या देशातील सर्व लोक जेव्हा पर्यावरण विषयक जागरूक होतील तेव्हाच आपली पृथ्वी हरित आणि सुजलाम, सुफलाम सश्य श्यामलाम बनेल.

For any other query regarding the Marathi Essay on Environment, you can ask us by leaving your comment below.

Updated: November 5, 2019 — 7:48 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *